Monday, January 25, 2016

महालक्ष्मीचा पाठ

श्री महालक्ष्मीचा पाठ। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरूभ्यो नमः। जय माई मार्कण्ड माई । श्री कुलदेवतायै नमः।
अविघ्नमस्तु

नमन तुला श्री गजानना । विघ्नहर्ता तु गजवदना । पुर्ण करूनी सर्व कामना । यश दे मला गौरीनंदना । 1 । शरण तुला श्री गणपती । कवनास देवा द्यावी मती । करितो श्रध्देने तव भक्ती । हे थेउरवासी चिंतामणी । 2 । जय जय श्री गौरीतनया । वक्रतुण्ड हे महाकाया । जय तुझा सिध्दीविनायका । पालक तु आमचा चिन्मया । 3 । रक्षी प्रभो मज लंबोदरा । शरण तुला मी विघ्नेश्वरा । प्रणिपात हे बल्लाळेश्वरा । दे यश धन मयुरेश्वरा । 4 । कृपा असावी गिरीजात्मका ।  गाती स्तवन विघ्नहारका ।  तारावे या तुझीया सेवका ।  नमन श्री वरदविनायका । 5।  दे अभय, अभय वरदा । लोटांगणे माझी सहस्रदा । तव पावन पदा, भालचन्द्रा । प्रसन्नवदना यश दे सदा । 6 । अष्टभुजेचा पाठ हा रचिला । आशीर्वाद त्रिनेत्रा द्यावा मला । सौख्य द्यावे गणेशा सकला । वाहतो या शब्दमाला तुला । 7 । नमन तुला श्री सरस्वती । विद्यादेवी  महा भगवती । सकल कलांची तु स्फुर्ती । वीणाधारी  दिव्य वागीश्वरी । 8 । ऐका  ऐका श्रोते जन । निर्मळ करा आपले मन । पूर्ण पावलो समाधान । ऐका दृष्टांताचे कवन । 9 । मग दृष्टांताची कथा सुन्दर । सांगतो आता मी सविस्तर । चित्त ठेउनी अति स्थीर । श्रोत्यांनो एेकावी निरंतर । 10 । अंबाबाई  तुवा देउनी दृष्टान्त । मज रूप दाविले स्वप्नात । सेविले तुझ्या रूपाचे अमृत । ते वर्णी आता येथ । 11 । आज वर्षे दोन पुरी झाली । कथा ही खरी घडली । अष्टभुजा मज प्रसन्न झाली ।कृष्णा तीरी त्या राउळी । 12 । अश्विन शुध्द अष्टमीला । रात्री  दृष्टांत हो हा घडला । सांगतो देवी भक्तांना सकळा ।  जो पाहिला मी सुखसोहळा । 13 । आपत्ती घोर आल्या मजवर । एकामागुनी एक भयंकर । क्रुर दैवगती करी प्रहार । मी विटलो संसारास अपार । 14 । गेली तीन मुले सुंदर ती । जन्मताच हो गोजिरवाणी । करूनी काळजाचे पाणी पाणी । मम कांतेचे तरूणपणी । 15 । स्मशान कळा आली घरास । जाती मुले येता जन्मास । एक जन्मला पुत्र करूनी नवस । जन्मांधच तो आला जन्मास । 16 । जडला रोग असाध्य कांतेस । पडली खिळून अंथरूणास । उत ये त्यातच दारिद्र्यास । विटलो मी संसारास । 17 । भ्रमिष्ट झाली माझी मती । दुःख्ख भोगी भार्या सती । कुणास सांगावी स्थिती । संसाराची झाली माती । 18 । चिडून जगावर निघालो भटकत । पायी यात्रा एकटा करीत । वेड्यासम चाललो नादात । तगमग मनीची शांतवीत । 19 । लागले कृष्णातीरी एक ग्राम । भवानीनगर त्याचे नाम ।  सृष्टी सौर्न्दयाचे जणु धाम । वाटला घ्यावा मनी विश्राम । 20 । पवित्र वाहे कृष्णा माउली । मांगल्य मूर्तिमंत त्या जली । भूमी ती सारी पावन झाली । पुण्य जले युगे युगे न्हाली । 21 । तीरी मंदिर विशाल एक । श्री अष्टभुजेचे सुरेख । नक्षी स्तंभास्तंभावर प्रत्येक । कोरिली चित्रे अंबेची कित्येक । 22 । बाग समोर आलेली बहरा । सोनचाफा निशीगंध मोगरा । दरवळे आसमन्त सारा । सुगंधाने भरलेला वारा । 23 । भव्य सभामंडप निवांत ।मंद दीप जळे एक शांत । गूढ भासे तो एकान्त । विसरलो क्षणभर मी खंत । 24 । अंबेचे ते जागृत स्थान । कृष्णा तीरी एक महान । लवते श्रध्देने ही मान । हरपते सार अन भान । 25 । राहिलो रात्री मी मंदिरी । अश्विन शुध्द अष्टमीला कृष्णा तीरी । दुःख्खाने पोळलो होतो अंतरी । श्रध्दने टेकला माथा अंबेच्या पदावरी । 26 । उच्च वेदीवरी अधिष्ठीत । उभी देवी गाभार्यात । ठसले ते रूप ह्रदयात । आले नीर अन् लोचनात । 27 । झळाळे मुकुट दिव्य । हिरवी साडी चोळी रूप भव्य गळ्यात सुवर्णहार असंख्य । पाषाणातुनी उमलले काव्य । 28 ।  करी कंकणे लखलखती । पायी जोडवी चमचमती । बाहुभूषणे झगझगती । मंगलरूप ते वर्णावे किती । 29 । सकल श्रृंगार देवीला । धूपाने धुंद गाभारा भरला ।  घमघमती ताज्या   फुलामला । दीप मिणमिणता एकला । 30 । हाती गदा खड्ग बलशाली । मळवट भरलेला भाळी  । उभी समोर अंबा माउली । परम भक्ताची साउली । 31 । घेतली रानफुले करात । प्रखर भक्ती पेटली ह्रदयात । गेलो समोर आवेगात । घातला साष्टांग प्रणिपात । 32 । धुतली आसवांनी पाउले । असीम श्रध्देने शीर टेकले । भान पुरते हरपुनी गेले । ह्रदयी कल्लोळ प्रेमाचे उसळले । 33 । अंबेचे ते पाहुनी रूप। सरलि नेत्राची उघडझाप । सरले सारे मनीचे  व्याप । 34 । विसरलो दुःख्ख विसरलो सुख । विसरलो अमृत विसरलो वीख । केवळ दिसे अंबेचे रूप सुरेख । नाठवे गरदार काही एक । 35 । पुसले कळवळुनी अंबेला । संकटात का टाकले मला । माते काय गुन्हा घडला । दुःख्खाने का जाळतेस मला । 36 । माझ्यावरी का आणल्यास  आपत्ती । हिरावूनी नेलीस संतती ।  आरोग्य शांती  अन संपत्ती । 37 । कर मुक्तता माझी यातुनी । ना जाईन तोवरी येथुनी । आता चरण तुझे सोडुनी । माते सांगतो तुला निक्षुनी । 38 । भक्त तुझा पडता संकटी । दुःख्खे तु त्याची निवटी । त्यावरी करोनी कृपादृष्टी । धरितेस आपुल्या पोटी । 39 । असे म्हणुनी अष्टभुजा मातेस । मिठी मारली तिच्या चरणास । शरण अंबिकेचा मी दास । तळमळूनी केला अट्टाहास । 40 । राहिलो तसाच रात्रभरी । माथा टेकुनि त्या पायांवरी । श्रध्देने बेहोष मी अंतरी । भाव ठेविला अष्ट भुजेवरी । 41 । तदा अदभुत गोष्ट घडली । मध्यरात्रीच्या गुढ वेळी । अंतर्धान मूर्ति ती पावली । मूर्तीतुन प्रकटली अंबा माउली । 42 । मी थरथरलो रूप पाहुनी । लोटांगण घातले हात जोडुनी । वाहू लागले नीर लोचनातुनी । देखूनी ती भगवती योगिनी । 43 । हिरवे पातळ भरजरी । हिरवी चोळी त्यावरी । हिरव्या बांगड्या करी । मळवट अन भाळावरी । 44 । गळ्यात हार सुवर्णांचे । चमचमत्या असंख्य रत्नांचे । शरीर भासे तप्त कांचनाचे । देदीप्यमान रूप ते अंबेचे । 45 । हाती खड्ग चक्र गदा कमल । झळझळे रूप ते विमल । प्रभा फाकली सर्वत्र धवल । कोटी चन्द्रांचे उगवले मंडल । 46 । किती प्राशावे रूप ते मनोहर । डोळे हवेत सर्वांगावर । तरी आत्मा ना तृप्त होणार । समोर अंबा पहाता साकार । 47 । निःशब्द पडलो मी खाली । अचानक तो अमृतवाणी झाली । क्षणी तनु माझी रोमांचली । एेकुन अमर ती शब्दावली । 48 । भिउ नकोस माझ्या बाळा । रक्षिते मी तुजसम भक्ताला । श्रध्देने जो शरण आला । आशीर्वाद उठ लडिवाळा । 49 । माझ्या स्वरूपाची महती । वर्णावया तुझ देते शक्ती । श्रध्दा ठेउनी करावी भक्ती ।  होईल सकल सुखाची प्राप्ती । 50 । सांगते व्रत तुला एकपण । निष्ठेने कर त्याचे आचरण । सुखदायी होईल सारे जीवन । मनीच्या इच्छा सफल संपूर्ण । 51 । गहन  रानात , नदी पल्याड । आहे औदुंबराचे एक झाड । सभोवती त्याच्या भव्य पहाड । भयाणता नांदते तेथे गाढ । 52 । त्या औदुंबरा खालती निवान्त । महातपस्वी एक महंत । दत्तात्रेयाचा अवतार मूर्तिमंत । करी तपश्चर्या वर्षे गेली सात । 53 । सेवा महन्ताची तू त्या कर । भयाण अरण्यी राहुनी खडतर । तो प्रसन्न होईल जेव्हा तुजवर । सांगेल माझ्या रूपाचे स्तवन सुंदर । 54 ।  बोलुनी अदभुत अशी वाणी । अदृश्य झाली जगदंबा झणी । नयनांत आनन्दे आले पाणी ।। प्रसन्न मजवर जगदंबा योगिनी । 55 । काळी गहन रात्र मृत होउन । जन्मली पहाट बाहेर नवीन । पूर्वा माता प्रसूत होउन । जन्मा आले सुर्य नारायण । 56 ।  क्षितिज वेलीला सुमंगल । आले विशाल सूर्यफूल । लागली पक्ष्यांस चाहुल । झाली सुरू गोड किलबील । 57 । विशाल क्षितीज वेलीवरी सारा । की गहरला उषेचा फुलोरा । उजळला कृष्णेचा किनारा । विरला एक एक तारा । 58 । माझ्या मनी आनन्द कोंदला । सुरूवात झाली नव जीवनाला । लोटांगणे घालुनी देवीला । निघालो महन्ताच्या सेवेला । 59 । प्रवाहात कृष्णेच्या पहाट वेळी । खुशाल उडी मी झोकली । ध्यानी मनी अंबा माउली । तारणारी तीच संकट काळी  । 60।  पार करूनी क्षणात । आलो मी गहन रानात । अंधार रानी दिवसाही आत । जाती सर्प काळे समोर फुत्कारित ।61 । धडधडे भीतीने अंतःकरण । निघालो करीत अंबेचे स्मरण । तीच करणारी सर्वांचे रक्षण । वंदितो जगदंबे तुझे चरण । 62 । तो दिसले औदुंबराचे झाड समोर । बसलेला त्याखाली महंत धोर । केला भक्तीने त्यास नमस्कार ।  सांगितला घडलेला प्रकार । 63 । अभय दिले महंताने मला । श्रध्देने लागलो मी सेवेला । कंदमुळे होती खाण्याला । जमीन अन झोपण्याला । 64 । पहाटे आणावे मी पाणी । काढावा आश्रम झाडूनी । सांगीतलेले काम करूनी । वाहिलो महंताच्या सेवेत । 65 । निष्ठा राखुनी राहिलो मी रानी । खंगले शरीर उपवासानी । प्रसन्न झाला महंत एकेदिनी । म्हणाला आशीर्वाद देउनी । 66 । सांगतो अष्टभुजेचे स्तवन । स्वरूपाच्या तिच्या मंगलगान । कर अता त्याचे श्रवण । अति निर्मळ ठेउनी मन । 67 । जो करील देवीचे स्तवन । गाढ श्रध्देने अनुदिन । दुःख्ख जाईल त्याचे निघुन । संकटाचे होईल दहन । 68 । होईल पुत्र त्यास,जो निःसंतान । मिळेल विपुल यश धन ।  गाजेल त्याची कीर्ती महान । होतील कामना सफल संपूर्ण । 69 । असे म्हणूनी महन्त तो महान । करी सुरू अष्टभुजेचे स्तवन । केले सर्वांगाचे मी कान । श्रवण करण्यास ते कवन । 70 । जय जय अष्टभुजे सबले । जगन्माते महामंगले । तु विश्व सारे निर्मीले । वंदितो तुझी चरण कमले । 71 । जय जय श्री भवानी माते । तुळजापूरच्या महादेवते । अभय दे वर दे शक्ती दाते । शरण शरण आम्ही तुला माते । 72 । जय देवी जय श्री जोगेश्वरी । निवास तुझा गे पुण्यपुरी । सुखशांती दे या संसारी । कर मनीची कामना पुरी । 73 । जय अंबे करवीरवासिनी । विश्वतारिणी पाप हारिणी । सकल कला कामिनी । चण्डमुण्ड विनाशिनी । 74 । जय जय देवी एकवीरे । प्रणाम करितो आदरे । विश्व उभे तुझ्या आधारे । तु निर्मिलेस सुर्यतारे । 75 । जय सप्तश्रृंगी माउली । भक्तांची तु गे साउली । तु जयंती भद्रकाली । माथा ठेवितो तुझ्या चरणाखाली । 76 । जय जय ग्रामवासी पद्मावती । भक्तीने करितो आरती । कर सकल कामना पूर्ति । ह्रदयात वसे तुझीच मूर्ती । 77 । जय जय महषासुर मर्दिनी । यश दे वरदायिनी । देवी पाप विनाशिनी । सकल खल निर्दालिनी । 78 । जय जय चण्डिके भैरवी । तेज झळाळे जणु कोटी रवी । किती वर्णावी तुझी थोरवी । कृपा भक्तावरी असावी । 79 । जय जय देवी दुर्गा । नष्ट कर शत्रुच्या गर्वा । सौख्य दे जगती सर्वा । लखलखते तुझ्यामुळे पुर्वा । 80 । रूप दे जय दे भगवती । कर नष्ट शत्रु जगती । यश दे देवी तु महाशक्ती । नमन तुला महामती । 81 । सुख दे सौभाग्य शांती  दे योगिनी । पुत्र दे धन दे वरदायिनी । कीर्ती दे विद्या दे जननी । आरोग्य दे तपस्विनी । 82 । तु शैलपुत्री ब्रह्मचारिणी  । तु स्कंदमाता कात्यायिनी । दुर्गा महिषासुरमर्दिनी । शुंभ निशुंभ  विनाशिनी । 83 । तु चंद्रघंटा कुष्माण्डा । व्यापिलेस सकल ब्रहृ्मांण्डा । तुझा गावा महिमा केवढा । मी शरण तुला बापुडा । 84 ।  तु महागौरी सिध्दीदात्री । भव्य भैरवी कालरात्री । तु निर्मीली धरित्री । प्राण ओतीलास या गात्री । 85 । तेजाने तुझ्या गे उज्ज्वल । उमलले हे विश्व कमल । वाहुनी मम  मन कमकल । पूजितो तव पद विमल । 86 । तु जयंती भद्रकाली स्वाहा । कपालिनी मंगला क्षमा महा । दीन भक्त शरण तुला हा । रक्षी आम्हा देवते महा । 87 । नमन तुला विश्वस्वामिनी । हे मधुकैटभनाशिनी । अभय दे कल्याण दायिनी । सुखशांती दे वरदायिनी । 88 । तेज तुझे झळाळे देवी । कोटी कोटी जणु रवी । तव इच्छेने चाले पृथ्वी । भद्राकली हे भैरवी । 89 । तु सकल विश्वाची स्वामिनी । जगत निर्माती जननी । संहार करिशी तु प्रलयिनी । महामंगला सर्वव्यापिनी । 90 । तु स्वाहा तु स्वधा अमृतरूपी । तु वषटकार प्रणवातील मात्रा तिन्ही । सकळ स्वरांचे मुळ तत्वरूपी । विश्वाचे आदितत्व तवरूपी । 91 । तु महामाया महाविद्या आई । महाबुध्दी महास्मृती देवी । महा मोहा महेश्वरी महादेवी । अंबे रूपे तुझी नवी नवी । 92 । नमन तुला महाकाली सती । तु महालक्ष्मी सरस्वती । तव भक्तीने संकटे नासती ।  शरण शरण तुझ्या प्रती । 93 । सेवा तुझी घडो सुरेश्वरी । भक्ताकडुनी जन्मभरी । कर दया तुझिया सेवकावरी ।  हे महामंगले भुवनेश्वरी । 94 । तु खड्ग शुल कमल धारिणी । शंभ निशुंभास मारलेस रणी । मुक्त केलीस दैत्यापासुनी धरणी । अभय मिळते तुझ्या चिंतनी । 95 । जगदंबे तु वेदांचा आधार । विष्णुला ना लागला तुझा पार । सकल शास्त्रांचे तु सार । कर भव सागारतुनी नौका पार । 96 । गाती सकल देव तव कीर्ती । दैवी तेजाने घडविली तुझी मूर्ती । सकल विश्वाची तु स्फूर्ती । कर भक्ताची कामना पूर्ती । 97 । लक्ष्मी तु वससी विष्णु ह्रदयी । गौरी तु शंकराची महायोगी । कांती तुझी दिव्य कांचनमयी । कर सर्व कार्यास यशदायी । 98 । रूप दे जय दे योगेश्वरी । सुख सौभाग्य शांती दे जोगेश्वरी । आरोग्य धन दे परमेश्वरी । पुत्रपौत्र दे भुवनेश्वरी । 99 । तु सुंदर सत्य सनातन । तव चैतन्याने भरले जीवन । भक्तीने दाटले मम मन । नमन नमन वाहतो सुमन। 100 ।अंबे तु सुख सौभाग्यदायिनी । तु सकल कला कामिनी । योगिनी महाविलासिनी । नमन नमन तुला जननी । 101 । असे आहे अष्टभुजेचे हे स्तवन । कर श्रध्देने याचे तु पठण । मुक्त होशील सर्व दुःख्खातुन । म्हणे तो महंत महान । 102 । घेउनी आशिर्वाद तदा महन्ताचा । परतलो स्वगृही तसाच रात्रीचा । वरदहस्त मजवर जगदंबेचा । आनन्द वर्णू किती ह्रदयीचा । 103 । पाठ केला श्रध्देने शुक्रवारी । दिवसा राहिलो निराहारी । उपवास संध्याकाळी सोडला तदनंतरी । भाव ठेविला अंबेवरी । 104 । आचरिले व्रत असे स्तवनाचे ।  तो गेले असाध्य दुखणे कांतेचे । आश्चर्य अंधत्व सरले पुत्राचे । चमत्कार सारे हे जगदंबेचे । 105 । बोल सांगतो हे प्रचितीचे । स्तवन करा अष्टभुजेचे । वितळतील पर्वत संकटांचे । आटतील सागर दुःख्खांचे । 106 । अगाध मायेची हो करणी । सामर्थ्य आहे स्तवनी । वेल बहरेल अहो पाषाणी । प्रसन्न होता दुर्गा भवानी । 107 ।  जय जगदंबे माझे आई । कृपा करी हो अंबाबाई । चित्त लागु दे तुझे पायी । मी स्तवन तुझे गाई । 108 । श्रध्दा ठेउनी अंतरी । पठण जो पाठाचे करी । स्वप्नी येउनी जोगेश्वरी । करील कामना सफल पुरी । 109 ।  होईल पुत्र ज्यास नसे संतान । जगतील मुले जी जाती जन्मून । बरे होतील रोग कठीण । असाध्य जे महा भयाण । 110 । जो करील पाठ हा  श्रवण । दारिद्य्र त्याचे जाउन दारूण । मिळेल त्यास अपार धन । होईल जगी त्याचा मान । 111 । यश मिळेल अपूर्व विद्येत । आनन्द नांदेल सदा घरात । बुध्दी वाढेल  सकल ज्ञानात । श्रध्दा ज्याची अंतरात । 112 । सुख सौभाग्य शांती लाभेल सदा । दूर पळतील आपदा । मिळेल अचानक अशा धन संपदा । जगदंबा आहे अभय वरदा । 113 । या पाठाचे जो करील पुजन । आणीक करील श्रवण पठण । त्यास गावेल सुखाची खाण । अंबेचे ठेवावे सदा स्मरण । 114 । करोनी जगदंबेस नमस्कार । श्रध्देने करावा शुक्रवार । पाठ म्हणावा तदनंतर । अति शुध्द ठेउनी अंतर । 115 । भावे भजा अंबा चरण । आणि करा पाठ श्रवण । नउ मास भरता पुर्ण । अंबा स्वप्नी तोईल अवतीर्ण । 116 । भुकेल्यास द्यावे अन्न । तेणे होय जगदंबा प्रसन्न । आत्म्याला होईल समाधान । मिळेल विपुल यश धन । 117  । जैसी जैसी कराल भक्ती । तैसी वाढेल यशकीर्ती । फल पडेल पदरी निश्चीती । संशय आणू नये चित्ती । 118 । नमन तुला जगदंबा  आई । ह्रदयात तु सदा वसावी ।तव कीर्ती मी गावी । कृपा माते माझ्यावरी असावी । 119 । जगदंबेची कृपा होता । स्वर्ग लाभे आपुले हाता । इतरांची मग काय कथा । लववितो अंबे चरणी माथा । 120 । कथिला हा माझा अनुभव । भक्तास संकटी तारितो देव । गाढ असु द्यावा भाव । मुखी अन जगदंबेचे नाव । 121 ।


। भगवती  ॐ श्री अष्टभुजा जगदम्बा माउली चरणार्पणमस्तु । 


1968 साली छापलेल्या एका पोथी मध्ये हा अष्टभुजा महालक्ष्मीचा पाठ मला मिळाला व त्याची मला तत्काल प्रचिती मिळाली म्हणुन देवी भक्तांसाठी तो पाठ मी येथे दिला आहे. त्याची साधना करून लाभ घ्यावा ही देवीभक्तांकडुन अपेक्षा !! खाली काॅमेंट बाॅक्समध्ये आपले विचार जरूर कळवावेत हि विनंती !!! धन्यवाद .  

https://mohankharkar.com/about/

http://mohankharkar.wordpress.com/

http://maiism.weebly.com/

http://universalreligionmaiism.blogspot.in/

http://www.tumblr.com/blog/mohankharkar

http://crispywonderlandtriumph.tumblr.com/

https://maiismwordpree.wordpress.com/about/


http://mohankharkar.wix.com/mai-ism?fb_ref=Default

http://www.twitter.com/mohankharkar2

http://www.facebook.com/mohan.kharkar3


http://www.facebook.com/groups/godasmother


http://mohankharkar.wix.com/mai-ism1?fb_ref=Default

http://mohankharkar.wix.com/mai-ism2?fb_ref=Default

http://mohankharkar.wix.com/mai-ism3

http://mohankharkar.wix.com/mai-ism4?fb_ref=Default

http://mohankharkar.wix.com/mai-ism5?fb_ref=Default

http://mohankharkar.wix.com/mai-ism6?fb_ref=Default

http://mohankharkar.wix.com/mai-ism7?fb_ref=Default

https://medium.com/@jayashreekharkar/god-as-universal-divine-mother-mai-maiism-ce9e5f23c5e2#.ecowmp6d6


http://www.chennaimath.org/istore/product/sri-lalitha-sahasranama-sri-lalitha-trisati-cd-chanting/

http://maaiism.blogspot.in/2015/06/introduction-in-appreciation.html?spref=fb


No comments:

Post a Comment